*"पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न"*
*– –*
*जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोरोना नियत्रंणात : जिल्ह्यातील चिकू आतराष्ट्रीय बाजारपेठेत*
*– पालकमंत्री दादाजी भूसे*
पालघर (प्रतिनिधी)दि. 15 :- कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 25 टक्के नागरीकांचे लसीकरण करण्यात आले असून उर्वरित नागरीकांचे लसीकरण लवकरच करण्यात येईल. तसेच जिल्ह्यामध्ये ऑक्सीजन प्रकल्प स्थापन करण्यात आले असून काही प्रकल्पाचे काम प्राधान्याने पुर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांना कोरोना नियमाचे काटेकोर पालन करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या प्रयत्नामूळे जिल्हयातील कोरोनावर नियत्रंण ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रागणांत मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी, सिध्दाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ई पीक पाहणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
कृषि मालाचा निर्यात व्यापार सन 1993 मध्ये सामावेश करण्यात आला व त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करणेत येत आहे. त्यामुळे कृषिमाला करिता बाजारपेठ खुली झाली आहे आणि विविध कृषि माल निर्यातीसाठी संधी निर्माण झाल्या आहेत. खुल्या जागतिक व्यापारामुळे कृषिमाल निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ताजी फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये देशात आघाडीवर आहे. राज्यातून विशेषतः ताजी फळे, भाजीपाला, फुले, रोपे, कलमे इत्यादी मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. फळांमध्ये प्रामुख्याने आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, चिकू तर भाजीपाला मध्ये भेंडी, दुधीभोपळ, मिरची, कारले, कडीपत्ता, आळू, पडवळ, वांगी, गवार, कांदा इत्यादींचा समावेश असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
अमेरिका, युरोपियन युनियन, चिन, कॅनडा अशा विविध देशांना कृषिमाल निर्यात केला जातो. मालाच्या किडमुक्त व कीडनाशक उर्वरित अंश विरहीत कृषिमालाच्या हमी बरोबरच त्याच्या पूर्वइतिहासाबाबत मागणी केली जात आहे. यासाठी निर्यातक्षम ताजी फळे व भाजीपाला या पिकांच्या निर्यात प्रमाणीकरणासाठी व Phytosanitory तपासणीसाठी एक आदर्श कार्यपद्धती (SOP) विकसित केलेली आहे. त्यानुसार निर्यातक्षम बागांची/शेतांची ऑनलाईन नोंदणी देखील केली जाते. यासाठी Mangonet, Vegnet, Grapenet, Citrusnet, Anarnet या Hortnet ट्रेसिबिलिटी ऑनलाईन प्रणालीमध्ये बागांची/शेतांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोकणामधून मुख्यतः आंबा, काजू, चिकू इ. फळपिकांची निर्यात केली जाते. या पिकांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
दिनांक 16 व 17 मे 2021 रोजी “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात 3 व्यक्ती मयत व 4 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. 14348 शेतकऱ्यांचे 6 हजार 57 हेक्टर आर क्षेत्राचे शेती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. 95 घरांचे पूर्णत: पडझड व 14312 घरांचे अंशत: पडझड होऊन नुकसान झाले आहे. तसेच 28 अंशत: व 25 पूर्णत: बोटीचे व 266 जाळ्यांचे पुर्णत: नुकसान झाले आहे.
सदर नुकसानीसाठी शासनाकडून विशेष दराने मदत जाहिर केल्याने 51 कोटी 51 लाख इतके अनुदान जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहे. सदरचे अनुदान बाधित व्याक्तिंना वाटप करण्याची कारवाई सुरू असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
ग्रामीण गृह निर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणे यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जुन 2021 या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले आहे. अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत 25440 घरकुल मंजुरी देण्यात आली होती व अभियान कालावधी पर्यत एकूण 25665 घरकुलाना मंजुरी देण्यात आली त्यापैकी अभियान कालावधी पर्यत 25551 लाभाथ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आले व अभियान कालावधी पर्यंत एकूण 22774 घरकुले पुर्ण करण्यात आली. राज्य पुरस्कृत योजने अंतर्गत 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत 5806 घरकुल मंजुरी देण्यात आली होती व अभियान कालावधी पर्यंत एकूण 6343 घरकुलाना मंजुरी देण्यात आली त्यापैकी अभियान कालावधी पर्यंत 6285 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला व अभियान कालावधी पर्यंत एकूण 4798 घरकुले पूर्ण करणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील शेल्टे येथील पुरबाधिताना सुरक्षित ठिकाणी हलवून प्रसंगावधन दाखवणारे शेल्टे गावचे संरपच राजु गायकर, उपसरपंच प्रविण पाटील, गजानन पाटील, राजेंद्र पाटील, सागर ठाकरे, यांचा सन्मान करुन सत्कार करण्यात आला. तसेच अब्दूल कलाम फाऊन्डेशन अंतर्गत निवड झालेल्या तलासरी तालुक्यातील अनिता विलास खेबला, समता सुरेश गुरव, मुकेश विलास खेवला, दिनेश विबेश कोती, साक्षी अशोक बर्गे या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी, तालुका स्तरीय, ग्रामीण स्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा ही यावेळी पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment