*जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी जनजागृती*
पालघर(प्रतिनिधी) दि. १२ :-बालमजुरी ही एक अनिष्ट प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडित असल्यामुळे या प्रथेविरुध्द विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे.
दरवर्षी १२ जून हा दिवस जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून देशभर पाळला जातो. बालमजुरीच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी जिल्हयातील मालक असोसिएशनची तसेच कारखान्यातील व्यवस्थापकांची झूम बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत बाल कामगार कायद्यातील तरतुदीबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. असोसिएशन प्रतिनिधींना त्याचे असोसिएशनचे सभासद असलेल्या कारखानदारांना त्यांचे कारखान्यात तसेच घरी कोणत्याही प्रकारे बाल कामगाराकडून काम करुन घेतले जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
विविध मालक असोसिएशन्सना बाल कामगार कामावर ठेवण्यात येऊ नये असे लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले असून, महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अनुषंगाने १४ वर्षाखालील मुलांना कामावर न ठेवण्याबाबत विविध शासकीय कार्यालयांनादेखील पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.
"बालमजुरीची कलंकित व अनिष्ट प्रथा नष्ट करुन बाल कामगार मुक्त महाराष्ट्र" करण्याच्या अभियानात तन, मन, धनाने क्रियाशील करण्याबाबत कर्मचा-यांना शपथ देण्यात आली.
भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य हे बालकांचे मुलभूत अधिकार आहेत. बालकाचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायम स्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले असून १४ वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणा-यांविरुध्द जबर शिक्षेची तरतूद केली आहे.
त्याच अनुषंगाने केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ पारित केलेला आहे. अधिनियमानुसार १४ वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय / प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच १४ वर्षे पूर्ण परंतु १८ वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने / नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास, त्यांस ६ महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा रु.२०,०००/- (रुपये वीस हजार) ते रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार ) पर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते अशी तरतूद आहे.
जनजागृतीसाठी आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्यामध्ये पालघर, बोईसर, विरार व वसई रेल्वे स्टेशन येथे पॅम्पलेट वाटणे, आस्थापनाकडून हमीपत्र भरुन घेणे, NO CHILD LABOUR स्टिकर्स लावणे इत्यादी कार्यक्रम केले जाणार आहेत.
No comments:
Post a Comment