पैठणीचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी वेगळ्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल करावी - जि.प.अध्यक्ष भारती कामडी
पालघर(प्रतिनिधी) जिल्ह्यातील महिलांना लोणचं,पापड, मसाले यांच्या मर्यादेत न ठेवता पैठणी, वारली पेंटिंग शिकवून वेगळ्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन आज जि.प.अध्यक्षा भारती कामडी यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आज उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत महासमृद्धी महिला सक्षमिकरण अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. या अभियानाच्या उद्घाटना वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अशा प्रकारची आशा व्यक्त केली होती.त्यास अनुसरून आपल्या जव्हार मोखाडा सारख्या ठिकाणी औद्योगिक वसाहती किंवा इतर उत्पन्नाची साधने नसल्याने महिलांना रोजगार मिळत नाही.त्यामुळे उमेद ने असे वेगळे उपक्रम राबविल्यास महिलांना रोजगार ही मिळेल आणि जिल्ह्याची वेगळ्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल झाल्याची सिद्ध होईल.असेही मत भारती कामडी यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद संकुल सभागृह येथे ही कार्यशाळा आयोजित केली होती. वित्त व बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, समाजकल्याण सभापती विष्णू कडवं यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली.
या अभियानात दशसूत्री कार्यक्रम राबवायचा असून पालघर जिल्ह्याला राज्यस्तरीय बक्षीस प्राप्त करायचे असेल तर सर्व यंत्रणा व सर्व पदाधिकारी यांचा सहयोग असणे आवश्यक आहे.तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेचे जीवन सुसह्य करायचे असेल तर बँक करेस्पोंडेन्स तथा बँक सखी ची नितांत गरज आहे असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले.
या अभियानातील दशसूत्रीचे स्वरूप काय असेल याची सविस्तर स्वरूप तसेच कोव्हीड बाबतचे सर्व नियम पाळून हे अभियान राबवले जाईल अशी माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा माणिक दिवे यांनी दिली.
स्वयं सहायता गट, ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करणे, महिलांचे उपजिविकेचे स्त्रोत वाढवण्यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रात उद्योग निर्मिती साठी निधी व कर्ज वितरित करणे, महिलांची उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंग वर काम करणे महिलांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रदर्शन शॉप सहकारी व कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादने विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, स्वयंसहायता गटां मार्फत शासनाचे विविध विभाग, कार्यालये, संस्था, पंचायत राज संस्था यांना सेवा व साहित्य पुरवठा करणे, बेरोजगार युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना कार्यक्रम अभियानाचा लाभ महिलांना मिळवून देणे, ग्रामीण महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व स्वच्छता कार्यक्रमातील उपक्रमांची माहिती महिलांना देऊन उपक्रम राबविणे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाच्या उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे ही या अभियानाची दशसूत्री आहे. या वेळी अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे, सर्व विभाग प्रमुख, सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा अभियान व्यवस्थापक तसेच उमेद चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment