*मनरेगाच्या माध्यमातून स्थलांतर व कुपोषण थांबवणे शक्य - खा.राजेंद्र गावित*
*खा.राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समिती ची बैठक सम्पन्न*
पालघर (प्रतिनिधी) रोजगार हमी योजना ही शासनाची महत्वकांक्षी योजना असून या योजनेकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पालघर जिल्ह्यातील स्थलांतर आणि कुपोषण थांबवायचे असेल तर मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू घरात रोजगार निर्माण करता येईल, येईल असे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खा राजेंद्र गावित यांनी केले.
खा.राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली
आ.सुनिल भुसारा, आ.राजेश पटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) केंद्र पुरस्कृत योजना आढावा बैठक नियोजन भवन पालघर येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जव्हार मोखाडा कडे लक्ष देणे गरजेचे आहेच, परंतु त्यासोबतच वसई पूर्व भाग, वाडा पश्चिम व उत्तर भाग व जिल्हाभरात इतर सर्व ठिकाणी जेथे स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी शासनामार्फत अभिनव उपक्रम राबविले गेले पाहिजेत, यामध्ये मोगरा लागवडी सारख्या उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे असे मतही खा.राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील कुपोषणाला आळा घालायचा असेल तर महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग ,आदिवासी विकास विभाग यांची संयुक्त टास्क फोर्स स्थापन केली पाहिजे असे मत आ. सुनील भुसारा यांनी व्यक्त केले.
या बैठकीस जि. प बांधकाम व अर्थ सभापती काशिनाथ चौधरी, मोखाडा पं.स. सभापती सारिका निकम, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, वसई विरार महानगरपालिका आयुक्त गंगाधरण डी, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सालीमठ, निवासी जिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, प्रकल्प संचालक माणिक दिवे, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागा मार्फत ही आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकी दरम्यान प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण पेयजल योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी, पाणी पुरवठा इत्यादी योजनांबद्दल विस्तृत आढावा घेण्यात आला.
महिला व बाल विकास विभागाचा आढावा घेताना जिल्ह्यातील कुपोषित बालकांची स्थिती, कुपोषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, अंगणवाडीच्या अपूर्ण बांधकामांचा आढावा घेण्यात आला.
सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला यावेळी शाळांची स्थिती, निवृत्त शिक्षण कर्मचारी पेन्शन प्रक्रिया, सर्व शिक्षा अभियानाच्या योजना, याबद्दल विस्तृत आढावा घेण्यात आला.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर मास्क लावून,सामाजिक अंतर, सभागृह निर्जंतुकीकरण करून ही बैठक पार पडली.
No comments:
Post a Comment