Monday, August 9, 2021

लम्पी स्कीन डिसीज - लसीकरण करून घेणे बाबत पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

*लम्पी स्कीन डिसीज - लसीकरण करून घेणे बाबत पशुसंवर्धन विभागाचे आवाहन*  

पालघर(प्रतिनिधी) दि. ०९ :- पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये सध्या जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज हा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळून आला आहे सदर रोगाच्या उपचारासाठी व प्रतिबंधक उपाय योजना म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून पाहणी, तपासणी, कार्यशिबिरे, कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतं आहेत. त्यामुळे पशु पालकांनी घाबरून जायचे विशेष कारण नाही. वरिष्ठ पातळीवरून या रोगाच्या प्रतिबंधक उपचारासाठी लस उपलब्ध करण्यात आली असून बऱ्याच बाधित कार्यक्षेत्रामध्ये लसीकरण मोहिमा, कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच लसीकरण सुविधा ही  प्रत्येक पशु वैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जात जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण करून घ्यावे  असे    आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ प्रशांत ध कांबळे यांनी केले आहे. सदर रोग हा विषाणूजन्य साथीचा रोग असून लहान वासरांमध्ये याची अधिक तीव्रता दिसून येते. सदर आजार हा प्रामुख्याने सर्व वयोगटातील संकरीत व देशी गाय वर्ग, म्हैस वर्गातील पशुधनास होऊ शकतो. या विषाणूचे शेळ्या व मेंढ्या तील देवीच्या विषाणू शी साधर्म्य आढळून येते. मात्र हा रोग शेळ्या व मेंढ्यामध्ये आजीबात होत नाही. सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरामध्ये तीव्रता अधिक प्रमाणात आढळून येते. रोगामुळे मार्तुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधित जनावरे अशक्त होतात. ह्या आजाराचा प्रसार एका बाधित पशुधानापासून दुसऱ्या पशुधनाला डास ,चावणाऱ्या माश्या व गोचीड यांच्यामार्फत होतो. ह्या रोगाचा प्रसार दमट हवामानामध्ये जास्त प्रमाणात पाहण्यास मिळतो. 

* *प्रसार :*
● डास ,चावणाऱ्या माश्या, गोचीड यांच्या मार्फत होतो. 
● विषाणू चा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. 

* *नियंत्रण :*
● गोठ्यातील किटकासाठी कीटकनाशकांची फवारणी करून गोठा निर्जंतुक करणे आवश्यक असल्यामुळे व परिसरात पाणीसाठा होणार नाही याची दक्षता घेणे बाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
● बाधित जनावरांना वेगळे ठेवण्या बाबत सूचित करण्यात आले आहे. 
● ज्या भागामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे अश्या भागातील पशुधनाची वाह्तुक व विक्री थांबविणे आवश्यक असल्याने अशी वाहतूक कटाक्षाने टाळण्यात यावी अशा सूचना पशुसंवर्धन विभागा तर्फ देण्यात आल्या आहेत. 
● जनावरांची तपासणी झाल्यावर कपडे, फुटवेअर गरम पाण्यात धुवून निर्जंतुकीकरण करावे. 
● सर्व ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणारे जनावरांचे गोठे, परिसर हें र्निजंतुकीकरण करून कीटकनाशकाची फवारणी करने बाबतीत संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास निर्देशित केले आहे. 
● गावं परिसरात एक जरी बाधित जनावरे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करण्यात यावा. सदर भाग बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे. असे आवाहन डॉ. प्रशांत ध. कांबळे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, पालघर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...