पालघर(प्रतिनिधी) दि. 08 :- पालघर जिल्ह्यात करोना
प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या
हालचालींनी वेग धरला असून या
लसीकरणासाठीची रंगीत तालीम
(ड्राय रन) शुक्रवार दि.८ जाने २०२१ रोजी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मासवण आश्रमशाळा येथे जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या विशेष देखरेखीखाली पार पडली.
लसीकरणसंदर्भात आवश्यक
असलेल्या बाबींची पूर्वतयारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमांचे पालन करून ही रंगीत तालीम घेतली गेली.यावेळी प्रत्यक्षात लस टोचली नसली तरी लस टोचण्यासाठी झालेली पूर्वतयारी याची पाहणी यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.
जिल्ह्यातील एकूण १६,००० कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी ही ड्राय रन आयोजित करण्यात आली असून कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची आहे.लस घेते वेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तेथेच त्यावर औषधोपचार करण्यात येतील,तसेच लस घेणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे त्यावेळी घेऊन जावीत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी देऊन ही रंगीत तालीम म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आहे, असे मत व्यक्त केले.
जिल्ह्याला ही लस प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात आशा,आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या ११,९१३, खाजगी शहरी व ग्रामीण भागातील ५४९८ आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षावरील सर्व नागरिक, व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा रुग्णांना लस देण्यात येईल.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी यांनी लसीकरण मोहिमेत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि.प.सदस्या अनुश्री पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक अनिल थोरात, अति. जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे, आयुष अधिकारी डॉ.तन्वीर शेख, डॉ.महेश बडगुजर, इतर आरोग्य अधिकारी कर्मचारी, आशा,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment