*प्लेगप्रमाणेच कोरोनाला सामोरी जाणारी पिढी म्हणजेच सावित्रीबाई फुले - श्रीकांत मयेकर*
पालघर (प्रतिनिधी)सावित्रीबाई फुले या केवळ थोर समाजसुधारक जोतिराव फुले यांच्या पत्नीच नव्हत्या, तर त्या शिक्षण तपस्विनी होत्या. त्यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीतून पुण्यातील प्लेगच्या साथीमध्ये दिलेले योगदान दुर्लक्ष करून चालणार नाही. आज कोरोना महामारीला तोंड देणारी पिढी म्हणजेच सावित्रीबाई फुले. असे उद्गार तरुण पालघरचे कार्यकारी संपादक श्रीकांत मयेकर यांनी काढले.
वरळी येथील एन.एस.डी.अंध उद्योगगृह यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या *महिला शिक्षण दिन* या कार्यक्रमात उपस्थितांपुढे आपले विचार व्यक्त करताना श्रीकांत मयेकर म्हणाले की, ज्या काळात महिलांवर शिक्षणाचे निर्बंध होते त्या काळात 1848 साली सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा उघडून क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाकडून महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून येणाऱ्या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे आवाहन श्रीकांत मयेकर यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमास सर्वश्री कार्यालयीन अधिक्षक आनंदा भुरे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे माजी विश्वस्त मोहन म्हामुणकर, मजूर फेडरेशनचे संचालक राजेंद्र देसाई, नरेश चिंतलपल्ली, विक्रम तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृह अधिक्षक विवेक मोरे यांनी केले.
No comments:
Post a Comment