“ 5 डिसेंबर” जागतीक मृदा दिनानिमीत्त जिल्ह्यातील गाव पातळीवर कार्यशाळा
पालघर :(प्रतिनिधी) 03 : शेतकऱ्यांच्या जमिनीतील अन्न घटकांची माहिती आणी त्यासाठी आवश्यक असणारे खते किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे जमिन सुपिकता निर्देशांक फलक ग्रामपंयाचतीत लावुन जमिन आरोग्य पत्रिकेचे वाचन करण्यात येणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर काशीनाथ तरकसे यांनी माहिती दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिन साजरा करतांना गावपातळीवर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यावेळी गावातील जमिनीतील अन्नद्रव्यांचा सुपिकता निर्देशांक त्या गावात जमिनीतील असणारे घटक त्याला आवश्यक खत आणी त्याची मात्रा यासंदर्भांत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर गावातील प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायतमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात 1008 गामपंचायतीचे जमिन सुपिकता निर्देशांक तयार करण्यात आलेले असून ते प्रत्येक ग्रामपंचायतीत फलकावर लावण्यात येत आहेत. जमिन सुपिकता निर्देशांक तयार करताना गावातील प्रमुख पिकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात माती परिक्षणासाठी सन 2015-16 पासुन जिल्ह्यात मृदा आरोग्य पत्रिका योजनेची अंमलबजावणी करण्यात येते आहे. यामध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक 2 वर्षानी त्याच्या शेत जमिनीची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देणे व मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खताच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेच्या प्रथम सायकलमध्ये 16475 मातीनमुने, द्वितीय सायकल (सन 2017-18 व 2018-19) मध्ये 16745 माती नमुने व पथदर्शी कार्यक्रम (सन 2019-20) मध्ये 2608 मातीनमुने असे एकुण 35558 माती नमुने यांची माती परिक्षण करण्यात आलेले असुन माती परिक्षणाचे एकुण 187437 मृदा आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत. सदर जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता स्थितीची माहिती देण्यात येते. माती परिक्षण नमुन्यांमध्ये नत्र, स्फुरद व पोटॅश ह्यांचे प्रमाणे मध्यम स्वरुपाचे आहे. यासाठी उत्पादन वाढीस आवश्यक लागणाऱ्या बाबींची माहिती देण्यात आलेली आहे.
रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते गांडुळ खत, निंबाळी/सल्फर आच्छादीत युरीयासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करण्याऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे, समस्याग्रस्त जमिनीमध्ये भुसुधारकांचा वापर करुन जमिनीच्या उत्पादकतेत वाढ करणे, हा या योजनेचा उददेश आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यातील 10 गावांची निवड करण्यात आलेली आहे. यावर्षी संबंधित गावामध्ये मागील सायकल मधील मृदा आरोग्य पत्रिका वर आधारीत पिक प्रात्यक्षिके आणी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. माती परिक्षणांवरुन जमिनीचा कस व जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धतता समजते. रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता माती परिक्षणानुसार पिकांना खतांच्या मात्रा दिल्यास खर्चात बचत होते. खतांचा संतुलित वापर केल्यामुळे पिकांची वाढ चांगली होउन अधिक उत्पादन मिळते.
*********
No comments:
Post a Comment