*कोकण विभाग*. ( विशेष लेख)
*कोव्हिड वर मात करुन प्रशासनाचे पाऊल पुढे*
विशेष प्रतिनिधी:-
कोराना महासंकटाच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याची धुरा साभाळण्यास सुरुवात केली जेमतेम शासनास चार महिने होत नाहीत तोपर्यंत या महामारीने रुद्र रुप दाखवण्यास सुरवात केली होती. जनतेचे प्राण वाचवणे हे शासनाचे प्रथम लक्ष होते. या साठी शासनाने आपली तिजोरी खाली केली निधीमधील मोठा हिस्सा कोरोना आटोक्यात आणण्यास दिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या प्रचंद इच्छा शक्ती मुळे तसेच अविरत कामामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाले तसेच मृत्यूदर फार मोठ्या फरकाने खाली घरसला हे सर्व करत असताना जिल्ह्यातील विकास कामे करण्यावर भर दिला गेला.
जिल्ह्यात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीवर जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांच्या समन्वयाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामुहिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरी 90 टक्के एवढे झाले आहे. रूग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मुख्यालय आणि तालुका स्तरावर वॉर रूम कार्यान्वित आहेत. त्याद्वारे रूग्णांच्या सहवासितांचा शोध घेऊन संनियंत्रण करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.
जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात एकुण 5 तर पालघर ग्रामीण भागात 22 कोविड केअर सेंटर(CCC) असुन वसई-विरारमहानगरपालिका क्षेत्रात 4 हजार तर पालघर ग्रामीण भागात जवळपास 3246 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 3 तर पालघर ग्रामीण भागात 5 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर(DCHC) आहेत. तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 4 तर पालघर ग्रामीण भागात देखिल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (DCH)आहेत. या ठिकाणी रूग्णांना विविध आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर्स आणि स्टाफनर्स व पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून गरजे नुसार रिक्तपदांवर भरती सुरू आहे. संशयित रुग्णांची RTPCR आणि रॅपिड ॲन्टीजन तपासणीद्वारे चाचणी केली जाते. डहाणू येथील MRHRU (मॉडर्न रूरल हेल्थ रिसर्च युनिट)
या लॅबमध्ये दररोज चाचण्या करण्यात येत आहेत. तेथे अत्याधुनिक RTPCR मशिन बसवण्यात आले चाचण्याची क्षमता वाढवण्यात येत आहे. तसेच ग्रामीण रूग्णालय पोशेरी येथे ट्रुनॅट मशिनद्वारा चाचण्या केल्या जातात. चाचण्यांसाठी प्रयोगशाळा, रॅपीड ॲन्टीजन कीटस्, दुर्गम भागात मोबाईल व्हॅनद्वारे ॲन्टीजन टेस्टींग आदींचे नियोजन करण्यात येत आहे. गरजेनुसार संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असून विलगीकरण सुविधा क्षमता वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या करीता राज्य शासनाकडून आपत्ती व्यवस्थापन निधी मधून गरजेनुसार निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे.
कोव्हिड-19 वर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध नाविन्य पूर्ण कृतिशील उपक्रमही राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात 18001215532 या टोल फ्री क्रमांकासह प्रत्येक गावात व नगरपालिकेच्या प्रभागामध्ये कोरोना प्रतिबंधक समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. जोखमीच्या व्यक्तींचे नियमित सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्येक आशा स्वयंसेविकांना पल्सऑक्सीमीटर तसेच थर्मल स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या शिवाय कोव्हिड-19 साठी प्रतिबंधात्मक उपाय, घ्यावयाची काळजी, रूग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी सूचना आदींबाबत विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या बरोबरीने महसुल विभाग, पोलिस दल, जिल्हा परिषद, नगरपरिषद या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ला कोव्हिड-19 च्या काळात झोकून देऊन काम करीत आहेत. आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, व अन्य विभागातील कर्मचारी कोरोनाने शहिद झाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये पालघर जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील 75,771 मजूरांना पालघर जिल्ह्यातून उत्तरप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, ओडीशा व पश्चिम बंगाल राज्यात जाण्याकरिता 45 विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. सदर विशेष श्रमिक रेल्वे प्रवास भाड्याची रक्कम रुपये 4,31,42,585/- (अक्षरी सुमारे चार कोटी एकतीस लक्ष बेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये मात्र) मा.मुख्यमंत्री सहायता निधीमधून अदा करण्यात आलेली आहे. या विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचा येथे विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी श्रमिकांची नोंदणी करून सर्व नियमांचे पालन करुन श्रमिकांना त्यांच्या घरी सुखरुप पोचवण्यास मदत केली.
तसेच गुजरात येथील पोरबंदर व वेरावळ या बंदरामध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील 20 हजारहून अधिक मच्छिमार बंधुना लॉकडाऊनच्या काळात डहाणू बंदरात उतरवून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुंबई व परिसरातून त्यांच्या मुख्य गावी पायी निघालेल्या मजुरांसाठी लेबर कॅम्प उघडून त्यामध्ये मजुरांची सोय करण्यात आली.
*प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना*
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत माहे एप्रिल ते जूलै 2020 या कलावधीत पात्र लाभार्थ्यांना 2 लाख 95 हजार 698 क्विंटल तांदूळ व 21 हजार 936 क्विंटल गहू मोफत वितरीत करण्यात आला आहे. माहे मे व जून 2020 या काळामध्ये आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेज योजनेअंतर्गत विनाशिधापत्रिकाधारक व विस्थापित मजूर यांना 13 हजार 500 क्विंटल तांदुळ, व 615क्विंटल अख्खास चणा मोफत वितरीत करण्यात अला आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनातर्फे 13 कम्युनिटी किचन द्वारे 37 लाख 24 हजार 223 व NGO 10 लाख 72 हजार 408 असे एकुण 47 लाख 96 हजार 631 असे फुड पॅकेट वितरीत करण्यात आले.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याकरिता पालघर जिल्ह्यात 26 जानेवारी 2020 पासून शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
*महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना 2019*
महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना 2019 जाहिर केली. सदर योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे त्यांचे पिककर्ज मुदतीत परतफेड करता आले नाही. त्यामुळे त्यांना नवीन पिक कर्ज मिळत नव्हते अशा शेतकऱ्यांना त्यांचे कर्जा पासुन मुक्ती देण्यात आली. पालघर जिल्ह्यात सदर योजनेनुसार आतापर्यंत 11 हजार 200 शेतकऱ्यांना रु. 62.00 कोटींचा लाभ देण्यात आला. तसेच या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 5,500 शेतकऱ्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असुन उर्वरीत शेतकऱ्यांना चालु हंगामात पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र 1 लाख 03 हजार 225 हेक्टर असून आतापर्यंत 88,030 हेक्टर वर (85%) पेरणी झाली आहे. उर्वरीत पेरणी अंतिम टप्प्यात आहे. यात प्रामुख्याने भात 68,270 हेक्टर, नागली 7474 हेक्टर चा समावेश आहे.
खरीप हंगामात कृषी विभागाने 67 हजार आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रती शेतकरी 250 ग्राम तुरीचे बियाणे मोफत वाटप करून त्याची पेरणी भाताच्या शेताच्या बांधावर करून घेतली आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना येणाऱ्या कालावधीत चांगल्या प्रतीची तूर उपलब्ध होईल. यामुळे त्यांच्या आहारात प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होऊन कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे.
भाताच्या एक पद्धतीमध्ये जोखिम असल्याने फळबाग आधारित शेती पद्धतीस चालना देण्यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2572 हेक्टर वर फळबाग लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यात जवळपास 1 लाख 75 हजार काजू कलमे लावण्यात आली आहेत. ही कलमे रत्नागिरी जिल्ह्यातून CSR अंतर्गत L&T व JSW यांच्या सहयोगाने वाहतूक करून शेतकऱ्यांना मोफत देण्यात आली.
जिल्ह्यात एक वर्षापूर्वी अतितीव्र कुपाषित बालकांची 273 तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 2480 इतकी होती. जिल्ह्यातील कुपोषण व बाल मृत्यु कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे आज अनुक्रमे 234 व 2225 इतकी कमी करण्यात यश आले आहे. शासनाने नुकतीच आदिवासी बहुल भागातील नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या परिस्थितीत विशेष मदत मिळण्यासाठी खावटी योजना मंजुर केली असून त्याचा जिल्ह्यामधील नागरिकांना फायदा होईल.
पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालय नजीकच्या काळात जिल्हावासियांना लाभणार आहे. सिडकोकडून सदर प्रकल्पाचे काम सुरू असून इमारतीचे स्थापत्य बांधकाम पूर्ण होत आहे. विद्युतीकरण, फर्निचर व रंगरंगोटीचे काम सुरू आहे. सदर काम पूर्ण होऊन लवकरच जिल्हा प्रशासनाचे काम नवीन इमारतीतून सुरू होईल.
आज पालघर जिल्ह्यात जी विकासकामे सुरू आहेत, ती पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भलेल्या आपतकालीन परिस्थितीत सर्व नागरिकांनी आता पर्यंत विशेष सहकार्य केले आहे. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकत म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व गृह भेटीद्वारे शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात शासनाला यश मिळाले आहे. या अभियाना अंतर्गत या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अंगीकार करून त्याचे पालन केल्याचे जानवत आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश मिळाले आहे.
कोरोना गेला नाही नागरिकांनी काळजी घेऊन आपले दैनंदिनी व्यवहार करावे असे अवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी जनतेला वेळोवेळी केले आहे. जनतेने सुध्दा या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हा प्रशासनाच्या हातात हात घालून या युध्दात अटीतटीचा संघर्ष केल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्हा माहिती अधिकारी,
पालघर
No comments:
Post a Comment