Monday, October 5, 2020

दिनांक :- 05 ऑक्टोबर 2020राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकररोपवाटिका उभारणीसाठी 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे

दिनांक :- 05 ऑक्टोबर 2020
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
रोपवाटिका उभारणीसाठी 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे
         पालघर (निलेश भोईर)दि. 05 :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गतच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेंतर्गत राज्यात 500 रोपवाटीकांची उभारणी करण्यात येणार आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आदि व इतर भाजीपाल्याची प्रत्येक रोपवाटीका उभारणीसाठी 4 लाख 60 हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 50 टक्के म्हणजे 2 लाख 30 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने दि. 02 ऑक्टोबर 2020 ते 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावा लागेल.
रोपवाटीकांसाठी  11 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. राज्यातील सर्व तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटीका उभारण्याचे प्रस्तावित आहे. भाजीपाला रोपवाटीकेसाठी एक हजार चौरस मीटरचा सव्वातीन मीटर उंचीचे शेडनेटगृह (सांगाडा), एक हजार चौरस मीटरचे प्लॅस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्पेअर, 62 प्लॅस्टिक क्रेट यांचा रोवपाटीकेच्या प्रकल्पात समावेश असेल. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीकेसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक असेल. महिला कृषि पदवीधारकांना पहिले प्राधान्य असेल. महिला गट, महिला शेतकऱ्यांना दुसरे, तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतकरी गटांना तिसरे प्राधान्य असेल.
रोपवाटीका पूर्णपणे नव्याने उभारावयाची आहे. पात्र अर्जानुसार सोडत पद्धतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाईल. तालुका स्तरावर प्राप्त उद्दिष्टानुसार स्थाळाची पाहणी करून हमीपत्र घेतल्यावर उद्दिष्टाच्या अधिन राहून पुर्वसंमती देण्यात येईल. त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत काम पुर्ण करून तीन महिन्यात पुर्ण करणे आवश्यक आहे. तसेच रोपवाटीकाधारकास बियाणे कायदा 1966 अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडून परवाना घेणे बंधनकारक राहील. उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडून पहिली तपासणी केल्यावर 60 टक्के अनुदान बँक खात्यात जमा होईल. मोका तपासणीवेळी रोपवाटीकेचे Geo-Tagging करणे बंधनकारक आहे.  रोपांची प्रत्यक्ष विक्री अथवा उचल झाल्यावर मंडळ कृषि अधिकारी यांनी दुसरी तपासणी केल्यावर 40 टक्के अनुदान बँक खात्यात दिले जाईल. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. के.बी. तरकसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर यांनी केले आहे.
*******

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...