वीजबिल वसुली मोहिमेला ग्राहक प्रबोधनाची साथ
वरिष्ठ अधिकारी फिल्डवर; विविध उपक्रमातून जागर; सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु
महावितरणच्या पालघर मंडल कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह विविध सरकारी आस्थापनांकडून मार्च महिन्यात जवळपास २११ कोटी रुपयांचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय अभियंते, अधिकारी, जनमित्र मोहिमेत सहभागी झाले आहेत.
मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर चालू वीजबिल व कोरोना विषाणूच्या संकटामुळे वाढलेली थकबाकी वसूल करण्यासाठी पालघर मंडळातील कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. 'माझे वीजबिल माझी जबाबदारी' ही संकल्पना रुजवून ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी पालघर, बोईसर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, सफाळे व तलासरी उपविभागीय कार्यालयांतर्गत रॅली, ग्राहक संवाद असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत ८४ कोटी रुपयांच्या वीजबिलाची वसुली आवश्यक आहे. यात ५ हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे २२ हजारहून अधिक ग्राहक असून त्यांच्याकडे ३४ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. मार्च महिन्यात पालघर मंडलात लघुदाब ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून १५ कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून घरबसल्या वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
महाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अभियानाला पालघर मंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत चार हजारहून अधिक कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीसह जवळपास तीन कोटी रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. पालघर मंडलात एकूण १३ हजार ४०० कृषिपंप ग्राहकांकडे १६ कोटी ६० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. यात बोईसर ग्रामीण उपविभाग - ३८१६ ग्राहक (८ कोटी ५१ लाख थकबाकी), डहाणू उपविभाग - ३२४४ ग्राहक (३ कोटी ६५ लाख थकबाकी), जव्हार उपविभाग - ३२६ ग्राहक (१२ लाख ७० हजार), बोईसर एमआयडीसी उपविभाग - ५५ ग्राहक (९४ हजार थकबाकी), मोखाडा उपविभाग - ६९ ग्राहक (४ लाख ५९ हजार थकबाकी), पालघर उपविभाग - २२८७ ग्राहक (२ कोटी ९२ लाख थकबाकी), सफाळे उपविभाग - २३६६ ग्राहक (५९ लाख ४३ हजार थकबाकी), तलासरी उपविभाग - ५८६ ग्राहक (३१ लाख ५९ हजार थकबाकी), विक्रमगड उपविभाग - ६६७ ग्राहक (४२ लाख ६२ हजार थकबाकी).
-----------
फोटोओळ - सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून घेण्याबाबत विक्रमगड येथे कर्मचारी-अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल. समवेत अधीक्षक अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंता प्रताप मचिये आदी.
No comments:
Post a Comment