Saturday, November 7, 2020

ग्रंथ चळवळीचे उपासक, शिक्षणप्रेमी अण्णासाहेब सावेl

ग्रंथ चळवळीचे उपासक, शिक्षणप्रेमी अण्णासाहेब सावे
……………………………………

पालघर (पंढरीनाथ गायकवाड)करोनाच्या संसर्गजन्य साथीने माणसाला जगण्याचे नवे आयाम घालून दिले. करोनावर मात करण्याची मनुष्याची जिद्दकायम असून, त्यात नजीकच्या काळात नक्कीच यश येईल. अशा साथीच्या संक्रमण काळात शिक्षण आणि ज्ञानदानाचे कार्यखंडित होईल ही अनेकांची भीती पालघरच्या सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींच्या महाविद्यालयाने मोडीत काढली. दुर्गमआदिवासी, बहुजन आणि गरीब मध्यमवर्गिय घटकांतील उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध करुन देतानाच, दांडेकर ब्रँडच्यादर्जेदार शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयाने अनेक यशस्वी उपक्रम राबविले आहेत. आता ग्रंथालय आपल्या दारी हा अभिनवउपक्रम हाती घेऊन इंडिया टुडे आणि आऊटलूक नियतकालिकाने देशातील उत्कृष्ट महाविद्यालयासाठी दांडेकरमहाविद्यालयाची केलेली निवड सार्थ ठरविली आहे.

करोनाच्या काळात वाचकांची इच्छा असूनही ते ग्रंथालयापर्यंत जाऊ शकत नव्हते. अशा विद्यार्थी आणि जिज्ञासू वाचकांसाठीसोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या रा. हि. सावे ग्रंथालयाने ग्रंथालय आपल्या दारी हा ग्रंथ वाचन संस्कृती चळवळीलाहातभार लावणारा कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचे सर्व ग्रंथप्रेमींनी मनापासून स्वागतच करायला हवे. पालघरजिल्ह्यांमधील ज्या गावांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशा किनारपट्टी, जंगलपट्टीभागातील निवडक गावात हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. यात पहिल्या टप्यात केळवा, माहीम, शिरगाव, सातपाटी,मासवण, निहे, लोवरे, नागझरी, वांदविले, खरशेत आणि काटाळे या गावांचा समावेश आहे.

ग्रंथालय आपल्या दारी या उपक्रमास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना आणखी व्यापक करण्याचा सोनोपंतदांडेकर शिक्षण मंडळी व्यवस्थापनाचा इरादा आहे. मुंबई आणि अन्य विद्यापीठातील समाजजीवनाच्या विविध विषयातीलपदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकींग आणि अन्यस्पर्धात्मक परीक्षांच्या व करिअरच्या तयारीसाठीचे ग्रंथ, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, कथा कांदबऱ्या, कविता, ललितसाहित्य, ऐतहासिक व राजकीय चरित्रे, बखर, विविध विषयांवर सखोल माहिती असलेली नियतकालिके, मासिके,संदर्भग्रंथ अशा वर्गवारीतील पुस्तके ३० दिवसांच्या कालावधीसाठी विद्यार्थी आणि व्यक्तींनासुद्धा उपलब्ध करुन देण्यातयेणार आहेत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा चौफेर सर्वांगीण विकास करणे, ग्रंथ वाचन संस्कृतीला उत्तेजन देणे, करोनाकाळात विद्यार्थ्यांना आवश्यक ती पुस्तके सहजपणे त्यांच्या घराच्या दारात उपलब्ध करुन देणे. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावीआयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अवांतर वाचनाचीही गोडी लावण्याचा यामागे उद्देश आहे.

पालघर जिल्ह्याला अभिमान वाटेल असे रा. हि. सावे ग्रंथालय आपल्या भागात आहे. या ग्रंथालयात शैक्षणिक,समाजजीवनाशी निगडीत अशी एकूण एक लाख १० हजारांपेक्षा जादा पुस्तके, ग्रंथ आहेत. यात काही दुर्मिळ ग्रंथ असून,अफाट माहितीचा खजीना दांडेकर महाविद्यालयात ग्रंथप्रेमी रा. हि. सावे यांच्या नावाने असलेल्या ग्रंथ भांडारात उपलब्धआहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत मुंबईच्या राजकीय व आर्थिक जीवन क्षेत्रात कमालीचे उंची गाठणारेव्यक्ती म्हणून रा. हि. सावे यांची ओळख नव्या पिढीला करुन देणे आवश्यक आहे. मूळचे तारापूरचे असलेले शिक्षण प्रेमी,दानशूर उद्योजक दिवंगत रामचंद्र हिराजी सावे यांनी साडेतीन दशकांपूर्वी दांडेकर महाविद्यालयात दर्जेदार ग्रंथालयाच्याउभारणीसाठी त्याकाळी पाच लाखांहून अधिक रुपयांचा निधी मुक्तहस्ताने दिला होता. इतकेच नव्हे तर तारापूर, चिंचणी,केळवे, जुन्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक संस्थांना त्यांनी लक्षावधी, कोटी रुपयांच्या देणग्या सामाजिकबांधिलकीपोटी दिल्या आहेत. आपल्या या भागात गर्भश्रीमंत लोकांची वानवा नाही. पण शैक्षणिक कार्य, ग्रंथ प्रसाराच्याउपक्रमासाठी कार्यरत संस्थांना उदार हस्ते देणगी देण्याची मोठी दानत असावी लागते. त्यात रा. हि. उर्फ अण्णासाहेब सावेयांचा वरचा क्रमांक लागतो.

पालघरच्या दांडेकर शिक्षण मंडळीच्या शैक्षणिक संकुलातील एका इमारतीच्या उभारणीसाठी रा. हि. उर्फ अण्णासाहेब सावेयांनी ५० लाखांची मदत त्याकाळी दिली होती. याच दांडेकर महाविद्यालयातील अनेक शैक्षणिक उपक्रमांना अण्णासाहेबांनीकिमान ८० लाख ते एक कोटीच्या आसपास आर्थिक निधी दिला आहे. यामागे आपल्या भागातील मुलामुलींना उच्चव्यावसायिक दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी हा अण्णासाहेबांचा उदात्त विचार होता. त्यांच्या देणगीचा दातृत्वाचागौरवार्थ दांडेकर महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या वास्तूचेही आर. एच. सावे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर असे नामकरणकरण्यात आले. तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयास अण्णासाहेबांचे नाव देण्यात आलेआहे. केळव्याच्या शाळेत व्याव्यामशाळेसाठी त्यांनी लाखोंची देणगी उदारहस्ते दिली होती.

तारापूरच्या हिराजी वामन सावे अर्थात हिरा मिस्त्री यांच्या कुटुंबात २३ मे १९१८ रोजी जन्मलेल्या रामचंद्र हिराजी उर्फअण्णासाहेब सावे यांचे जीवनकार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. अवघ्या दिड वर्षांचे असताना वडिलांचे छत्र हरपल्यानंतरमातोश्री भागीरथीबाई सावे यांनी त्यांना जिद्द, प्रामाणिकपणाने कष्ट करण्याचे बळ दिले. ते नेसत्या वस्त्रानिशी मुंबईलारवाना झाले. खडतर कष्ट करुन नातेवाईकांकडे वेळप्रसंगी फूटपाथवर राहून त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले.दिवसा गॅरेजमध्ये काम तर रात्री रात्रशाळेत शिक्षण घेतले. शाळा सुटल्यानंतर दादरला ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीपादअमृत डांगे, मिरजकर, जोगळेकर यांचे बौद्धिक राजकीय शिक्षणाचे वर्गाचाही त्यांना लाभ झाला. कम्युनिस्ट पक्षाच्या क्रांतीनावाचे दैनिक वर्तमानपत्र त्यांनी दोन पैसे मिळविण्यासाठी भल्या पहाटे गिरणगावात विकले. परळच्या धर्मानंद कोसंबीयांच्या मठात त्यांना काही दिवस निवाऱ्यासाठी राहावे लागले. बोर्डीला अध्यापनाचे शिक्षण झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्याआग्रीपाडा शाळेत त्यांना हंगामी शिक्षकाची नोकरी लागली. ती नोकरी त्या वर्षीच गेली. १९४२ च्या सुमारास चिंचणीच्याआत्माराम चुरी यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. शिक्षकांच्या कोऑपरेटिव्ह बँकेत कारकून झाले. १९४५ च्या सुमारासनोकरी सोडून ते भाजीपाल्याच्या घाऊक व्यवसायात भायखळा मार्केटमध्ये आले तेथे त्यांनी जम बसविला.

भायखळा हा कामगार कष्टकरी वर्गाचा भाग होता. गिरणगावची त्याकाळी सुबत्ता होती. यामुळे कम्युनिस्ट व समाजवादीविचारांचा त्या भागात प्रभाव होता. समाजवादी नेते बी. डी. झुटे आणि कम्युनिस्ट नेते गुलाबराव गणाचार्य यांचा प्रभाव होता.तथापि, रा. हि. उर्फ अण्णासाहेब सावे हे काँग्रेसच्या गांधीवादी विचारांशी जोडले गेलेले होते. एकेकाळचे मुंबईचे अनभिषक्तसम्राट स. का. पाटील यांच्या राजकीय गोतावळ्यात ते गेले. स. का. पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक बंदसम्राट जॉर्जफर्नांडिस यांच्याविरोधात अण्णासाहेबांनी आपल्या परीने किल्ला लढविला. शिवसेना त्यावेळेस जन्माला आलेली नव्हती.महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. अशा काळात स. का. पाटील,भानुशंकर याज्ञिक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली. त्यात ते जिंकले. १९६१ ते ६७ याकाळात मुंबई महापालिकेचे नगरसेवक या नात्याने त्यांनी काँग्रेसचा किल्ला लढविताना विविध नागरी प्रश्नांवर अभ्यासपूर्णआणि व्यासंगी मांडणी करुन मुंबईकरांच्या प्रश्नांची सोडवणूक केली.

गॅरेजमध्ये हेल्पर, शिक्षक, कारकून, भाजीपाला व्यापारी, नगरसेवक, उद्योजक आणि दानशूर व्यक्ती असा त्यांचा प्रवासआहे. कंपनी कायद्याचा अभ्यास करुन १९६४च्या सुमारास त्यांनी कांदिवलीत पराग इंजिनिअरींग प्रॉडक्टस प्रायव्हेटलिमिटेड कारखान्याची स्थापना केली. इंजिनिअरींग शिक्षणाचे ज्ञान नसतानाही धाडसाने सुरुवातीचे पाच वर्ष तोटा सहनकरुन त्यांनी परागचा जम बसविला. कारखानदारांची संघटना निर्माण करुन ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सशी संबंधितहोते. सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या अनेक संस्थांचे त्यांनी नेटाने काम केले. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हे त्यांचेसमकालीन असले तरी त्यांच्याशी त्यांचे या भागातील कार्यात तसे नाते जुळले नाही.

मुंबईसारख्या मायाजाल महानगरीत मोटारीच्या गॅरेजमध्ये हेल्पर म्हणून दरमहा आठ रुपयांवर काम करणाऱ्याअण्णासाहेबांनी विविध जीवनवाटा स्वीकारत उद्योजक म्हणून लाखोंची उलाढाल केली. त्यांना अपत्य नव्हते. तथापि, त्यांनीसावे कुटुंबियांनाच आपले मानून भाऊबंदकीतील अनेकांना जीवनात यशस्वी करण्यासाठी हरतऱ्हेची निरपेक्ष भावनेने मदतकेली. पालघरच्या दांडेकर शिक्षण मंडळीशी ते जोडले गेले. एकेकाळी शिक्षक प्राध्यापकांचा वेळेत पगार करण्यात अडचणीयायच्या. त्या काळात त्यांनी काही लाख रुपये बिनव्याजी स्वरुपात हातउसणवार दिले होते. माजी प्राचार्य लक्ष्मीकांत उर्फएल. बी. मंत्री, डॉ. अरुण पाध्ये हे अण्णासाहेबांच्या आर्थिक सहकार्याचे साक्षीदार आहेत.

सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या पाच दशकांच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीत पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्यापासून तेमाजी आमदार नवनीतभाई शाह यांच्यापर्यंत असंख्य दानशूर शिक्षणप्रेमींचा हात आहे. गेल्या १७ वर्षापासून सोनोपंतदांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ जी. डी. तिवारी यांच्या कार्यसंस्कृतीचा संस्थेच्या प्रगतीत वाटा आहे. रुईयामहाविद्यालयातील ग्रंथपालपद भूषविलेले आणि या शिक्षण संस्थेचे खजिनदार प्रा. अशोक रामचंद्र ठाकूर हे अण्णासाहेब सावेयांच्या दानयज्ञाचे साक्षीदार आहेत.

ग्रंथ आपल्या दारी हा उपक्रम ज्या रा. हि. सावे ग्रंथालयामार्फत राबविण्यात येत आहे. ते सावे नावाचे सदगृहस्थ कोण आहेतहे नव्या पिढीला कळावे यासाठी हा लेखनप्रपंच केला. या कामी चालनाकार अरविंद राऊत यांनी अण्णासाहेबांच्या षष्ट्यपूर्तीनिमित्त संपादित केलेल्या गौरवग्रंथाचा संदर्भ घेतला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांना सावे यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या आहेत. 

सोमवंशी क्षत्रिय समाजातील मोठे दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणाऱ्याअण्णासाहेबांच्या पश्चात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा आर. एच. सावे चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केला आहे. त्या माध्यमातून दरवर्षीमान्यवरांना रा. हि. सावे जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. त्यांचे नातू प्रा. किरण सावे हे दांडेकर महाविद्यालयाचे विद्यमानप्राचार्य म्हणून कार्यरत असून, अण्णासाहेबांचा शैक्षणिक विचारांचा वारसा ते पुढे नेत आहेत.

सुमारे सव्वा लाखांची ग्रंथ संपदा असलेल्या पालघरच्या रा. हि. सावे ग्रंथालयाने ग्रंथ आपल्या दारी हा वाचनसंस्कृतीचळवळीस उत्तेजन देणारा चांगला उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. याकामी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचेसमस्त व्यवस्थापन, प्राध्यापक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान आहे. याशिवाय ग्रंथ वाचन चळवळीच्या याकामासाठी रा. हि. सावे ग्रंथालयाच्या प्रमुख श्रीमती शीला गोडबोले यांचे तसेच त्यांचे सहकारी संतोष जोशी, भाविकागायकवाड, पंढरीनाथ गायकवाड व अन्य सहकार्यांनाही मनापासून धन्यवाद. 

ग्रंथ आणि शिक्षणप्रेमी दिवंगत रा. हि. उर्फअण्णासाहेब सावे हे ९४ वर्षांचे कृतार्थ जीवन जगले. त्यांची जन्मशताब्दी दोन वर्षापूर्वी झाली. सावे यांच्यासारख्या महान विभुतीच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...