Friday, May 28, 2021

उपक्रमशील शिक्षक श्री.भावेश संखे, राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित


*उपक्रमशील शिक्षक श्री.भावेश संखे, राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित*

          पालघर (प्रतिनिधी)मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार पालघर जिल्ह्यातील प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री भावेश रमेश शकुंतला संखे यांना प्रदान करण्यात आला.भगिनी समाज शाळेचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात संखे सरांचा नेहमीच चांगलाच हातखंडा असतो.

         मूळगाव कुंभवली (ता.जि. पालघर) परंतु वास्तव्यासाठी पालघर येथे राहणारे सत्कारमूर्ती श्री.भावेश संखे हे सन २००८ साली पालघर जिल्ह्यातील भगिनी समाज शाळेत रुजू झाले.तेव्हापासून त्यांच्या शिक्षक सेवेला बारा वर्षे अविरतपणे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ काळात त्यांच्या आवडीच्या गणित या विषयाच्या अध्ययन -अध्यापनाबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यात त्यांनी सोप्या पद्धतीने पाढे तयार करणे व पाठांतर करणे , भौमितिक आक्रत्याचे सुबक रेखाटन करणे, गणितीय सूत्रांचे पाठांतर , गणितातील उदाहरणे सहज-सुलभ पद्धतीने सोडवणे ,  बँकेची माहिती -व्यवहार पद्धतीचे प्रात्यक्षिक , निवडणूक प्रक्रिया प्रात्यक्षिक, विज्ञान प्रदर्शन , विद्यार्थी सहभागाचे संपूर्ण परिपाठ सादरीकरण ,  रिंग कवायत , काव्य लेखन उपक्रम , वक्तृत्व -कथाकथन-गायन-एकपात्री अभिनय - न्रत्य-वेशभूषा  अशा स्पर्धासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे , राष्ट्रीय ध्वजारोहणासाठी परेड संचलन , शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालन करणे , सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र-विभाग-तालुका व जिल्हा स्तरावर परीक्षकाचे कार्य , मतदार नोंदणी अधिकारी,जिल्हा स्तरावरील  शिक्षकांच्या प्रशिक्षणात गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक (साधनव्यक्ती ) अशा अनेक उपक्रमात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.अध्ययन-अध्यापनामध्ये नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करून तो विषय रंजक पद्धतीने शिकवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
सध्याच्या कोरोना काळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपक्रम राबविले. त्यात चला क्रती करूया , क्रतियुक्त मालिका , विविध वस्तूंपासून गणपती निर्मिती , आँनलाइन विज्ञान प्रदर्शन , आँनलाइन सांस्कृतिक कार्यक्रम, दिवाळी पंचक्रती , 'क'कवितेचा - 'म'मराठीचा,  माहिती किल्ल्यांची सुंदर हस्ताक्षराची आदी. आतापर्यंत त्यांनी शाळेत राबविलेल्या अशा सर्जनशील उपक्रमामुळे यावर्षीचा शिक्षकरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

     'पुरस्कार प्रेरणा देतात,प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!' या विचारसूत्रावर आधारित मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्था अनेक गेली अनेक वर्ष कार्यरत असून शैक्षणिक क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करीत असतात. श्री.भावेश संखे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्काराच्या स्वरूपात आकर्षक सन्मानचिन्ह,लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र,खास मानपत्र, मानकरी बॅच व मानाचा फेटा प्रदान करून सध्याच्या कोरोना काळात सदरील कार्यक्रम आभासी पध्दतीच्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाइन  घेण्यात आला.

          या प्रसंगी त्यांनी भविष्यात अध्यापन विविध सर्जनशील पद्धतीच्या साह्याने विद्यार्थ्यांचा क्षमताधिष्ठित सर्वांगीण विकास कसा सुकर होईल याबाबत  नेहमीच प्रयत्नशील राहील. मला मिळालेल्या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी अजून सकारात्मक कलवाढीस लागली असून हा सन्मान माझा नसून माझ्या विविध उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा,शाळेचा आहे. अशा भावना सत्कारमूर्ती उपक्रमशील शिक्षक श्री भावेश संखे यांनी व्यक्त केल्या.तसेच यासाठी त्यांना भगिनी समाज शाळेचे संस्थाचालक , मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांचे नेहमीच सहकार्य लाभत  असल्याचे सांगून त्यांचे  आभार मानले.

      पालघरच्या पंचक्रोशीतील शिक्षण क्षेत्रातून तसेच विविध समाज माध्यमातून सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*श्री.भावेश संखे, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व!* - मुख्याध्यापिका,सौ.प्रीती वर्तक,प्रा.वि. मं. भगिनी समाज,पालघर.

     पालघर (प्रतिनिधी)  आमच्या शाळेतील "सर्वगुणसंपन्न आदर्श शिक्षक" म्हणजे श्री.भावेश संखे सर.अध्ययन अध्यापनात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानार्जन करीत असतात.अशा आमच्या उपक्रमशील शिक्षकाचे गणित विषयात चांगले प्रभुत्व आहे. सरांचे हस्ताक्षर खूपच छान आहेत. शाळेतील कोणताही सहशालेय उपक्रम असला की सरांचा उत्साह, पुढाकार दांडगा असतो.सरांना स्वतःला शिक्षणाची आवड असल्यामुळे सरांचे उच्च शिक्षण सुरू आहे.अशा तऱ्हेने अष्टपैलू असणाऱ्या आमच्या भावेश सरांना लोकसेवा अकादमीचा शिक्षकरत्न पुरस्कार मिळत आहे त्याबद्दल मला माझ्या, सर्व शिक्षकांना तसेच आमच्या संस्थाचालकांना,पालकांना,आमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप आनंद झाला. आमच्या भावेश सरांना मानाचा मुजरा..!!
●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●

No comments:

Post a Comment