नाशिक जिल्ह्यातील सटाना तालुक्यातील पिंपळवाडे गावचे कुलदीप जाधव हे देशसेवा बजावतांना शहीद
शासकीय इतमामात करण्यात आले अंतिमसंस्कार
नाशिक प्रतिनिधी/ तुषार बऱ्हे
भारतीय सैन्य दलात जम्मू-काश्मीर जवळील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सेवेत असलेल्या सटाणा येथील कुलदीप नंदकिशोर जाधव (वय 25)यांचा शनिवारी झोपेतच मृत्यू झाला. कुलदीप जाधव हे चार वर्षापासून सैन्यात कार्यरत होते. जाधव हे जम्मू-काश्मीरच्या लेह भागात 508 एसी बटालियनमध्ये तैनात होते. राजौरी सेक्टर या भागात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा सैन्य अधिकारी ओंकार कपाळे यांनी दिली. कुलदीप जाधव हे नाशिक मधील सटाणा तालुका येथील पिंगळवाडे गावचे रहिवासी असून सटाणा येथील भक्षी रोड परिसरात वास्तव्यास होते.
आठ दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पाहण्यासाठी ते रविवारी सुट्टी घेऊन घरी येत होते तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याभरातून विविध पक्षाचे नेते, व मान्यवर जनसमुदाय आपल्या शहीद जवानाला श्रध्दांजली देण्यासाठी आलेला होता. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबाशी त्यांचे फोनवर बोलणे झाले होते व बाळाला पाहण्यासाठी येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती परंतु बाळाला पाहण्याचे त्यांचे स्वप्नही पूर्ण होऊ शकले नाही. शहीद कुलदीप जाधव यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व आठ दिवसाचा मुलगा असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment